नागपूर : ऑनलाईन व्यवहार चुकीचा झाल्याची तक्रार बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर करणाऱ्या ग्राहकाचा हेल्पलाईन नंबरनेच घात केला. बँकेच्या पासबुकवर नमूद असलेला हेल्पलाईन नंबर हा बँकेचा हेल्पलाईन नंबर नसल्याचे बँक व्यवस्थापकाने नाकारले. अखेर पीडित ग्राहकाने पोलिसांत तक्रार करीत, या फसवणुकीत बँकेचे अधिकारी गुंतले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.
डॉ. प्रशांत गायकवाड हे एसबीआय बँकेच्या उदयनगर शाखेचे ग्राहक आहेत. त्यांनी ३१ ऑगस्ट रोजी १४२७ रुपयांचा ऑनलाईन व्यवहार केला. हा व्यवहार करताना चुकीच्या खात्यात पैसे गेले. ही चूक कशी दुरुस्त करायची यासाठी त्यांनी स्टेट बँकेच्या टोल फ्री क्रमांक १८००४२५३८०० यावर संपर्क केला. हा क्रमांक त्यांच्या पासबुकवर नमूद आहे. हेल्पलाईनवरून ग्राहक प्रतिनिधीने त्यांना ॲनी डेस्क डाऊनलोड करायला लावले आणि त्यावरील फॉर्म भरायला सांगितले. सोबत एटीएम नंबर लिहायला सांगितला. एटीएम नंबरबाबत गायकवाड यांना शंका आली. त्यांनी प्रतिनिधीला विचारणाही केली. पण तो म्हणाला मला सांगू नका, फॉर्मवर भरा. फॉर्मवर एटीएम नंबर टाकल्यानंतर त्यांच्या खात्यातून २० हजार, २५ हजार व २५ हजार असे एकुण ७० हजार काढून घेतले. त्यांनी लगेच बँकेच्या उदयनगर शाखेतून खात्यातील व्यवहार ब्लॉक केले. बँकेची किंग्जवे येथील होम ब्रॅन्चच्या मुख्य व्यवस्थापकाला गायकवाड यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यावर व्यवस्थापकाने हा नंबर अधिकृत असल्याचे नाकारले. दुसऱ्या दिवशी गायकवाड यांनी नवीन पासबुक मिळविले पण त्यावरही तोच हेल्पलाईन नंबर होता. माझ्या खात्यातून पैसे उडविणारे दुसरेतिसरे कुणी नसून बँकेचे अधिकारीच आहे. त्यांनी चोरट्यांना हाताशी धरून माझे पैसे उडविल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.