सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये शरीरात रक्तस्राव झाल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही. परिणामी एखाद्या रुग्णाला जखम झाल्यास रक्तस्राव होतच राहातो. अशा रुग्णांना रक्त गोठण्यासाठी फॅक्टर आठ, नऊ, सेव्हन, फिबा इंजेक्शन द्यावे लागते. सामान्यपणे रुग्णांना महिन्याकाठी ३० ते ५० हजार रुपये औषधांपोटी लागतात. विदर्भात केवळ नागपुरातील डागा रुग्णालय व अमरावती जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियाचे इंजेक्शन नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु गेल्या महिन्यापासून डागा रुग्णालयात ‘सेव्हन’ व ‘फिबा’ इंजेक्शनचा साठा संपला आहे. अनेकांना प्रवासाचा त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करून अमरावती गाठावे लागत आहे. येथेही हे इंजेक्शन मिळेल याची हमी नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.प्रत्येक १० हजार लोकसंख्येत एक हिमोफिलियाचा रुग्ण आढळून येतो. या रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसते किंवा पूर्णपणे नसते. यामुळे रक्तामध्ये ‘थ्राम्बोप्लास्टीन’ हा रक्तातील घटक निर्माण होत नाही. रुग्णाला जर जखम झाली तर रक्तस्राव थांबत नाही. रुग्णांमध्ये शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला तर परिस्थिती अधिक गंभीर होते. यामुळे रुग्णाला ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ औषध दिले जाते. हे ‘फॅक्टर’ परदेशातून आयात होतात. यामुळे ते महागडे असतात. २०१५ मध्ये हिमोफिलियाच्या रुग्णांनी न्यायालयीन लढाई जिंकून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून ही जीवनावश्यक औषधे मिळवून घेतली. हे औषध मुंबई येथील केईएम रुग्णालय, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ससून रुग्णालय, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावती येथील जिल्हा रुग्णालयांमधून देण्याची सुविधा आहे. नुकतेच नागपुरातील डागा रुग्णालयातही ही औषधे उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, नि:शुल्क औषधे मिळत असल्याने राज्याबाहेरील रुग्णांची गर्दी वाढल्याने १२ महिन्यांचा साठा असलेले औषध चार-पाच महिन्यात संपल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोग्य विभागाने औषध खरेदीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे पाठविला आहे. परंतु औषध मिळण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
एका रुग्णाचा खर्च एक लाखावरहिमोफिलिया सोसायटीकडे नागपूर शहरातील ३५० रुग्णांची तर विदर्भात ४५० रुग्णांची नोंद आहे. परंतु जिल्ह्यात निदान न झालेले याच्या दोन ते तीन पटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. या व्याधीवरील औषध अत्यंत महाग आहे. एका रुग्णाचा वार्षिक खर्च सुमारे एक लाखाचा घरात जातो. व्याधिग्रस्ताला किती युनिट औषध द्यायचे ते संबंधित व्याधिग्रस्तांच्या वजनावर आणि होणाºया रक्तस्रावावर अवलंबून असते. नागपुरात औषधांचा तुटवडा पडल्याने विदर्भातील रुग्णांना अमरावतीला जावे लागत आहे. मात्र, बहुसंख्य रुग्णांना जाणे-येणे शक्य होत नसल्याने रुग्ण औषधांपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती आहे.