नरेश डोंगरे !
अब मै हर माैसम मे खुद को ढाल लेती हूं !
छोटी हूं पर घर के बडों का पेट पाल लेती हूं!!
नागपूर : स्वत:च्या पोटाची अन् शेकडो किलोमीटर दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची भूक त्यांना भारतात घेऊन आली. घर अन् गावच नव्हे तर प्रांत अन् देशही सुटला. विदेशी असल्या तरी त्यांनी येथे बनावट कागदपत्रे तयार करून घेतली अन् स्वत:चे शरीर विकणे सुरू केले. जेथे शंभर रुपये मिळणे दुरापास्त तेथे रोज हजारो रुपये मिळू लागले अन् विदेशात राहणाऱ्या तसेच भुखमरीत दिवस काढणाऱ्या त्यांच्या आप्तांना दोन वेळेचे पोटभर जेवण मिळू लागले. त्यामुळे देहविक्रयासारख्या घाणेरड्या व्यवसायात असूनही या महिलांना त्याची खंत नाही. स्वत: जगायचे आणि कुटुंबीयांना जगवायचे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे अन् हाच त्यांचा दृढनिश्चय आहे.
एसएसबीने शहरात चालणाऱ्या एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा २० सप्टेंबरला पर्दाफाश करून उझबेकिस्तानच्या दोन महिलांना अटक केली. यातील एक विवाहित, तर दुसरी अविवाहित आहे. या दोघी बनावट कागदपत्रे तयार करून भारतात राहण्याच्या (फसवणुकीच्या) आरोपात पोलिसांच्या ताब्यात आहेत. पाच दिवसांच्या चाैकशीत त्यांच्याकडून पोलिसांना सेक्स रॅकेटसोबतच या दोघी अन् त्यांच्यासारख्याच त्यांच्या देशातील अनेक तरुणींची करुणाजनक माहितीही मिळाली आहे. त्यानुसार, उझबेकिस्तानातील ज्या भागात त्या राहतात तेथे प्रचंड दारिद्र्य, बेरोजगारी, भुकमरी आहे. मुली शिकू शकतात, मात्र महिला-मुलींना मोकळे बोलण्या-फिरण्याला मनाई. एकत्र कुटुंब पद्धती अन् पुरुषांचीच मनमानी. बेरोजगारीमुळे पैशाचा वानवा, आठवडाभर काम करूनही तेथे शंभर रुपये (भारतीय किमतीचे चलन) मुश्किलीने मिळतात. अशात कुणाची प्रकृती बिघडली तर त्याच्या वेदना त्यालाच कळाव्या. त्यामुळे प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कुटुंबातील प्रत्येकच जण तरसतो. थंडी एवढी की हाडं गोठावीत अन् उन्ह एवढे तीव्र की शरीर होरपळावे. अशा स्थितीत एखाद्या कुटुंबाचा प्रमुख माणूस जर मेला तर त्या कुटुंबाचे हाल न ऐकलेलेच बरे. त्याचमुळे उझबेकिस्तानमधील निराधार कुटुंबातील अनेक जणी भारतात येऊन स्वत:चे देह विकून स्वत:सोबत उझबेकिस्तानात असलेल्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याचीही व्यवस्था करतात. ते तेथे सुखाचे चार घास खातात, हे कधीबधी फोनवरून कळते. त्यामुळे दरदिवशी स्वत:चा देह दुसऱ्याच्या हवाली करणाऱ्या या महिला-मुलींना कसलीही खंत वाटत नसल्याचे पोलीस सांगतात.
अशी पाठवतात रसद !
उझबेकिस्तानमधील अनेक जण नियमित दिल्लीत येतात. येथील कपडे किंवा अन्य चीजवस्तू तिकडे नेऊन विकण्याचा ते व्यवसाय करतात. या दोघी आणि त्यांच्यासारख्याच दिल्लीत राहून देशातील विविध भागांत वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला-मुली स्वत:चे खर्च वजा करता उरलेली रक्कम या 'व्यापाऱ्यांमार्फत’ आपल्या कुटुंबीयांना पाठवितात.
दलालाकडे पाचशेवर जणी
देशी-विदेशी बालांना वेश्याव्यवसायासाठी नागपुरातील तारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेणारा दलाल मनोज घनशानी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्याकडे वेश्यागिरी करणाऱ्या नागपूर, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरूसह वेगवेगळ्या शहरातील तसेच विदेशातील पाचशेच्यावर महिला-मुलींचे संपर्क क्रमांक असल्याचे सांगितले जाते.
---