संजय लचुरिया
नागपूर : शहरातील लालगंज परिसरात ७० वर्षांची तरुणी ट्रॅकसूटवर वाऱ्यासारखी पळताना बघून अनेकांच्या भुवया उंचावतात. या वयात अनेकजण विविध आजाराने ग्रस्त होऊन खाटल्यावर पडलेले असतात. पण शशिकला माने मास्टर्स ॲथ्लेटिक्समध्ये १००, २०० मीटर रनिंग, लाँग जम्पसारख्या खेळात पदके घेऊन येते.
विशेष म्हणजे धार्मिक वृत्तीच्या भजन, हरिपाठात मग्न असताना खेळण्याची ऊर्जा त्यांच्यात येतेच कशी हा प्रश्न अनेकांना पडतोय. शालेय जीवनात खो-खोपटू म्हणून त्या ओळखल्या जायच्या. लग्न लवकर झाल्याने आणि पुढे संसारात व्यस्त झाल्याने खेळाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. स्वत:च्या मुलासाठी एक किडनीही त्यांनी दान दिली. त्यांचे जगणे एका किडनीवर असताना ‘लोकमत’मध्ये मास्टर्स ॲथ्लेटिक्समध्ये भाग घेऊ शकता, अशी २००९ मध्ये जाहिरात आली. त्यात ५० वयोगटात त्या सहभागी झाल्या. त्या स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त केले. त्यानंतर त्यांच्यातील खेळाडूवृत्ती जागृत झाली.
मास्टर्स नॅशनल चॅम्पियनशिमध्ये त्यांनी सहभाग घेतला. तिथेही त्यांनी उत्तम परफॉर्म केला. त्यानंतर २०१२ मध्ये बँगलोर, २०१४ मध्ये कोईंबतूर, २०१५ मध्ये गोवा, २०१६ मध्ये म्हैसूर, २०१८ मध्ये बँगलोरमध्ये १००, २०० मीटर व लाँगजम्पमध्ये सुवर्ण, रौप्यपदकांच्या मानकरी ठरल्या. विशेष म्हणजे २०२३ मध्ये विविध स्पर्धेत त्यांनी १३ पारितोषिक पटकाविले.
४० वर्षात १३ ऑपरेशन झाले आहेत. पण खेळाडूवृत्तीमुळे मला कोणताच आजार नाही. हातपाय कधी दुखत नाही. खेळ आणि भजन हरिपाठात मी मन व्यस्त असते. त्यामुळे आजारपण जवळ येत नाही. मी देहदानाचा व नेत्रदानाचा संकल्प केलाय.
- शशिकला माने, मास्टर्स ॲथ्लेटिक्स