नागपूर : ज्येष्ठ कवी गुलजार यांची व्यक्त होण्याची काव्यमय शैली, तबला-मृदंगम-पखावज आणि वेस्टर्न बिट्सवर थयथय नाचणारे पाणी जणू विभिन्न नृत्यशैली एकमेकांशीच स्पर्धा करत आहेत, अधामधात कडक बिट्सवर उसळणारे आगीचे गोळे जणू ते पाण्याशी भांडायला नव्हे तर एकसाथ नृत्य करायला दाखल झाले आहेत, त्यात अतरंगी लाईट्सचा मारा आणि त्यातून वाऱ्यावर आपसूकच साकारल्या जाणाऱ्या रंगसंगतीचा देखावा आणि हळूच प्रेक्षकांच्या समोरल उलगडत जाणारा नागपूरचा पौराणिक आणि ऐतिहासिक पट... असा सारा नजारा नागपूरकरांना आणि नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना दररोज अनुभवता येणार आहे.
बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या फुटाळा तलावावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाण्यावर तरंगणाऱ्या संगीतमय कारंजा प्रकल्पाचे (म्युझिकल फाऊंटेन व लेजर लाईट शो)चे पहिले सार्वजनिक प्रात्याक्षिक सादर झाले. या प्रयोगाचा याची देही याची डोळा साक्षात्कार नागपूरकरांनी घेतला.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, माजी खा. अजय संचेती, सुलेखा कुंभारे, मेजर जनरल हुड्डा, राजेश बागडी, खादी ग्रामोद्योगचे संचालक जयप्रकाश गुप्ता, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, खा. डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त बी. राधाकृष्ण, वेस्टर्न कोलफिल्ड्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर, सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, डॉ. गौरीशंकर पाराशर, रेणूका देशकर, संदीप गवई, अशोक मानकर, बाळ कुळकर्णी, किशोर पाटील, दिलीप जाधव, ब्रिगेडियर समीर उपस्थित होते.
यावेळी नागपुरातील प्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्याय यांचे सुरेल बासरीवादन झाले. बासरीवादनासोबत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नाद अशी जुगलबंदी यावेळी रंगली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आरजे. राघव यांनी केले. आभार जयप्रकाश गुप्ता यांनी मानले.