योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक रुग्ण विविध तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळा व स्कॅन सेंटर्सला जात आहेत. सध्याची एकूण भयंकर स्थिती लक्षात घेता या खासगी आस्थापनांकडून विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अतिशय धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. कोरोना रुग्णांची नियमित रुग्णांप्रमाणेच चाचणी होत असून सुरक्षेच्या मानकांचे कुठलेही पालन करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. विशेषत: यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कुठल्याही पद्धतीने तपासणी होत नसल्याने कारवाईचादेखील धाक राहिलेला नाही.
एका कोरोना रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्तचाचणी करण्यासाठी विविध खासगी प्रयोगशाळांत विचारणा केली. कोरोनाबाधितांच्या रक्तचाचण्या काही ठराविक प्रयोगशाळांतच होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामदासपेठेतील एका पॅथालॉजी लॅब येथे चाचणीसाठी रुग्णाला नेण्यात आले. संबंधित प्रयोगशाळेत सुरक्षेच्या मानकांचे फारसे पालन होताना दिसत नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णाच्या रक्तांचे नमुने घेण्यासाठी तेथील कर्मचारी पीपीई किट तसेच सुरक्षित अंतर राखण्यात येईल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात केवळ मास्क घालून संबंधित कर्मचाऱ्याने रक्त काढले. याबाबतीत विचारणा केली असता काही होत नाही, असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. विशेष म्हणजे ज्या खुर्चीत रुग्ण बसला होता तिलादेखील सॅनिटाईझ करण्याची तसदी कुणीच घेतली नाही.कोरोनाबाधितांच्या पीपीई किट उघड्यावरचसंबंधित रुग्ण लोकमत चौकापासून गोरक्षणकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका स्कॅनिंग सेंटरमध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार सीटी स्कॅन करण्यासाठी गेला. प्रत्येकाला चाचणीअगोदर पीपीई किट घालणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार रुग्णानेदेखील पीपीई किट घातली. त्यानंतर स्कॅनिंग कक्षात नेण्यात आले. स्कॅनिंग झाल्यानंतर संबंधित ठिकाणी कुठलेही सॅनिटायझेशन करण्यात आले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित पीपीई किट मुख्य दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगण्यात आले. संबंधित डस्टबिन पूर्णत: भरली होती व तेथेच कोरोनाबाधिताने घातलेली पीपीई किटदेखील उघड्यावर टाकण्यात आली.प्रयोगशाळांकडून हलगर्जीपणा का?या प्रयोगशाळांमध्ये दररोज शेकडो लोक येत असतात. कोरोनाबाधितांचादेखील त्यात समावेश होतो. मात्र तेथील हलगर्जीपणामुळे या प्रयोगशाळाच कोरोनाच्या वाहक ठरू शकतात. सद्यस्थिती लक्षात घेता या प्रयोगशाळांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाकडून पाहणीच नाहीशहरातील अनेक खासगी प्रयोगशाळा व स्कॅनिंग सेंटर्सवर नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. वस्तुत: प्रशासनाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र कुणाकडूनही कसलीच पाहणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.