वसीम कुरैशी
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात वारसा स्थळांच्या संवर्धनाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या वारसास्थळांचा सौंदर्यविकास होणे अपेक्षित असताना, त्याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्षच दिसते.
पुरातत्त्वीय महत्त्वाचे निर्माण, इमारती, स्थळ आदींच्या संरक्षण व संवर्धनासाठी एक स्वतंत्र कमिटीही आहे आणि इतर स्वयंसेवी संस्थाही आहेत. परंतु, त्याचे परिणाम दिसत नाहीत. या स्थळांची स्थिती जशीच्या तशीच असल्याचे दिसून येते. विशेष मुहूर्तावर एखादी वॉक करून किंवा प्रदर्शनाचे आयोजन केल्याने संरक्षण कसे होणार? हा एक प्रश्न आहे. वेळा हरिश्चंद्र, नंदनवन, मोतीबाग, राजाबाक्षा आदी स्थळांवरील बाहुली विहिरी तसेच ग्रेट नाग रोड, केपी ग्राउंड येथील छत्रांची दयनीय स्थितीवर ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाश टाकला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी
- जबाबदार विभाग अशा वारसास्थळांकडे लक्ष देत नसेल तर या स्थळांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागली जाऊ शकते. मात्र, देशाच्या केंद्रस्थळांनी असलेल्या नागपुरातच ऐतिहासिक वारसास्थळांबाबत उदासीनता दिसून येते.
सगळेच काम थंड बस्त्यात
- नागपुरातील वारसास्थळांच्या संरक्षण व संवर्धनाच्या कार्यात प्रगतीच नाही. सर्व कामे थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. अशात विदर्भातील अन्य वारसास्थळांची स्थिती काय असेल, हा चिंतेचा विषय आहे. यासाठी पुरातत्व व संस्कृती विभागाचे पृथक विभाग असणे गरजेचे आहे.
- चंद्रशेखर गुप्त, वरिष्ठ पुरातत्व विशेषज्ञ
दत्तक घेण्यावर दिला जातोय भर
- शासकीय स्तरावर वारसास्थळांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत कुठलीच हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे, नागरिकांनाच जागरूक करतो आहोत. शाळा, महाविद्यालयांना हेरिटेज वृक्षांना दत्तक घेण्याचा आग्रह करतो आहोत. यात काही यश मिळू शकते. उपराजधानीतील जुन्या बाहुली विहिरी व तलावांत घाण झाली आहे. पाण्याचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. बाहुली विहिरी व तलावांना दत्तक घेतले जाऊ शकते. खासगी संपत्ती असलेली वारसास्थळे सहजतेने दत्तक घेता येऊ शकतात.
- मधुरा राठोर, को-आर्डिनेट, इनटेक, नागपूर चॅप्टर