नागपूर : जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालय व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २७ सप्टेंबर रोजी हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
महाल येथील टिळक पुतळा चौक येथून सकाळी ७.३० वाजता हेरिटेज वॉक सुरू होईल. यानंतर विठ्ठल रुख्माई मंदिर, शुक्रवार दरवाजा, रुख्मिणी मंदिर कॉम्प्लेक्स, सिनिअर भोसला वाडा, बाकाबाई वाडा, कोतवाली पोलीस स्टेशन, महाल-बुधवार बाजार, कल्याणेश्वर द्वार, गोंड किल्ला, आणि चिटणीस वाडा अशी यात्रा राहील. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी विमला आर. हे मुख्य अतिथी राहतील. या वॉकमध्ये टूर्स एण्ड ट्रॅव्हल्स एजंट सहभागी होतील. यानंतर सकाळी ११ वाजता नागपुरातील पर्यटन स्थळांच्या व्हीडिओ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. दुपारी १२.३० वाजता झिरो माईल जवळील सीताबर्डी किल्ल्याच्या भिंतीवर साकारलेल्या चित्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीने करतील. तसेच दुपारी ३.३० वाजता सर्वांगीण विकासासाठी पर्यटन या विषयावर व्याख्यान व प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.