रेडिओविश्व स्तब्ध े शोच्या ऐन मध्यात नियतीने साधला डाव े हृदयविकाराचा तीव्र झटकानागपूर : सकाळचे ७ वाजत आले की नागपूरकर तरुणाई कानात प्राण आणून रेडिओ जवळ करायची. घड्याळीचा काटा बरोबर ७ वर पोहोचताच रेडिओ मिर्चीवर हाय...हॅलो...कसं काय नागपूर...? ची मधूर साद निनादायची. नागपूरकरांना निद्रेतून जागविणारी ही साद आरजे शुभमची असायची. पण, यापुढे ही ओळखीची साद नागपूरकरांना ऐकता येणार नाही. कारण स्वत: शुभमच चिरनिद्रेच्या स्वाधीन झाला आहे. होय, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या असाधारण प्रतिभेने अगणित चाहते जोडणारा हा नागपूरचा देखणा अन् लाडका आरजे हे जग सोडून तिथे गेलाय जिथला आवाज कुठल्याच रेडिओवरून या जगात पोहोचतच नाही. रेडिओवर मॉर्निंग शो होस्ट करणारा भारतातला सर्वात कमी वयाचा एकमेव आरजे म्हणून शुभम केचेची एक वेगळी ओळख होती. गुरुवारी सकाळी त्याने नेहमीप्रमाणे आपल्या खास स्टाईलमध्ये शोची सुरुवात केली. ९.३० च्या सुमारास शो ऐनमध्यावर असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागले. तो वॉशरुममध्ये गेला व बाहेर पडताच कोसळला. सहकाऱ्यांनी लगेच त्याला हॉस्पिटलकडे नेले खरे पण रुग्णवाहिका रस्त्यात असतानाच नियतीने डाव साधला. शुभमच्या अशा अवेळी जाण्याने श्रोत्यांना मोठा धक्का बसला असून त्याचे मित्र, फॅन-फॉलोअर्सचे तर अश्रूच थांबायला तयार नाहीत. त्याला कारणही तसेच आहे. शुभम होताच तसा वेगळा, असाधारण. अत्यंत हलाखीची स्थिती पाहिलेला पण प्रचंड आत्मविश्वासाचा धनी. बर्डी मेनरोडवरील आनंद बेकरीच्या एका चिंचोळ्या गल्लीत त्याचे कुटुंब प्रदीर्घ काळापासून भाड्याने राहतात. वडील पंचशील चौकात चहाचे दुकान चालवायचे. दोन वर्षाआधी ते गेले. संसाररथाचे सारथ्य आईने पत्करले. घरी एक लहान बहीण. शुभमने अकॅडमी आॅफ ब्रॉडकास्टिंगचा कोर्स केला. प्रभावी कल्पकता आणि मधाळ आवाजाच्या बळावर अँकरिंग, मिमिक्री सुरू केली. चार पैसे यायला लागले. पुढे त्याने स्टँडअप कॉमेडी केली, रॅप लिहायला लागला अन् यातूनच आयुष्याला कलाटणी देणारी आरजेची संधी मिळाली. या संधीचेही शुभमने सोने केले. सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते ११ या वेळेत तो हॅलो नागपूर हा शो घेऊन यायचा.
‘हाय नागपूर’ ने शहर जागविणाऱ्या शुभमचा गुडबाय!
By admin | Published: October 21, 2016 2:31 AM