नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाचे मोफत गणवेश ठराविक पुरवठादाराकडून खरेदी करण्याची छुपी सक्ती पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे नाव सांगून करण्यात येत आहे. ही बाब म्हणजे शासनाने शाळा व्यवस्थापन समितीला दिलेल्या अधिकारावर अतिक्रमण करणारी ठरणार आहे.
गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येते व शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश खरेदी केले जातात. याबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासननिर्णयात गणवेशाचा रंग ठरविणे व खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. परंतु यावर्षी प्रथमच जि.प.शिक्षण समितीकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग ठरविण्यात आला. गणवेशाच्या रंगात एकसूत्रता असावी असे कारण त्यासाठी देण्यात आले. आता तर शाळांच्या मुख्याध्यापकांना काही ठराविक पुरवठादाराकडून दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करून तुमच्या तालुक्यातील मोफत गणवेश पुरवठा आमच्याकडे सोपवलेला आहे. त्यासाठी जि.प.मधील एका संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव सांगून त्यांचा संदर्भ दिला जात आहे.
- गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून सूचना
योजनेकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता अमुक पुरवठादाराकडूनच गणवेश खरेदी करा, अशा सूचना अमुक पदाधिकारी यांच्या असल्याच्या सूचना काही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रप्रमुखांमार्फत दिल्या जात आहेत. तर काही केंद्रप्रमुख गणवेश खरेदीबाबतच्या ठराविक पुरवठादारांच्या निविदा मुख्याध्यापकांना पोहचवून देत आहेत.
- गणवेश खरेदीसाठी छुपी सक्ती केल्या जात असल्याची माहिती संघटनेकडे आली आहे. अशा प्रकारची सक्ती करण्यात आली तर त्याबाबत संघटनकडून निश्चितपणे विरोध केला जाईल.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर