प्रज्ञा दया पवार : विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषणशफी पठाण नागपूरमराठा व दलित-आंबेडकरी समाजाची वैचारिक दैवते सारखी आहेत. त्यांच्यात जातीच्या विषयावरून संघर्ष शक्यच नाही. व्यभिचार ही वृत्ती आहे नि ती कुठल्याच विशिष्ट जातीची नसते. स्वातंत्र्या नंतरची अनेक वर्षे सलग सत्तेत राहिलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता या समाजातील तरुण आपल्याला जाब विचारतील ही भीती त्यांना सतावत आहे. आपले अपयश लपविण्यासाठीच कोपर्डीसारख्या विषयांना हवा देऊन तरुणाईची माथी भडकवली जात आहेत, असे प्रखर मत प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषण करताना त्यांनी अनेक विषयावर आपले बेधडक विचार मांडले. कोपर्डीच्या प्रकरणावरून आज रान माजले आहे. दलित विरुद्ध मराठा असे चित्र रंगवले जात आहे. पण, ते खरे नाही. या दोन्ही समाजामध्ये कुठलाही संघर्ष नाही. जी घटना घडली ती निश्चितच निंदनीय आहे. पण, त्यासाठी कुठल्याही एका समाजाला दोषी धरता येणार नाही. मराठा समाजाची अनेक मंडळी सत्तेत असताना त्यांनी भांडवलदारांना सोयीचे होईल असे धोरण राबविले. बक्कळ पैसा कमावला.पण, समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता दलितांच्या आरक्षणाकडे बोट दाखवले जात आहे. त्यांच्या आरक्षणाचे प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत नाही, असे विचार पेरले जात आहेत, असा आरोप प्रज्ञा पवार यांनी केला. पुरस्कार वापसीचा निर्णय योग्यचदेशात व राज्यात नवीन सरकार आल्यापासून धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे. यातूनच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कुणी बोलले तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. मी या वृत्तीचा निषेध करण्यासाठी राज्य शासनाचे पुरस्कार परत केले तेव्हा मलाही सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. पण, मला त्याची पर्वा नाही. नामदेव ढसाळांचे विचार माझ्या धमन्यांमध्ये वाहत असतात. या विचारांनीच मला पुरस्कार परत करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावर आता काहीही चर्चा होत असली तरी माझा तो निर्णय योग्यच होता. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचाही राजकीय आखाडाअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाला माझा विरोध नाही. मी आधी अशा दोन संमेलनांवर बहिष्कार घातला असला तरी त्याला काही तत्कालीन कारणे होती. खरं म्हणजे भाषा आणि संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने संमेलन हा चांगला पर्याय आहे. पण, या संमेलनासाठी जी निवडणूक होते ती आता राजकीय स्टाईलने लढली जाते. राजकीय पक्षांच्या घोषणापत्राप्रमाणे आपला परिचय व कार्य रंगीत कागदावर छापून मतदारांना पाठवले जाते. निवडून येण्यासाठी मतदारांना विनवण्या कराव्या लागतात. कुठल्याही विचाराधिष्ठित लेखकाला अशी विवशता मान्य नसते. म्हणून चांगले साहित्यिक या निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नाहीत, याकडेही प्रज्ञा पवार यांनी लक्ष वेधले.
‘ते सारे’ मराठा नेतृत्वाचे अपयश लपविण्यासाठीच
By admin | Published: October 06, 2016 2:46 AM