नागपूर : विधानसभा व विधान परिषदेत ज्या पक्षाची जास्त संख्या त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता होईल. याबाबत अध्यक्ष निर्णय घेतील. मात्र दोन्ही सहकारी पक्षाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घ्यावा असे आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. भाजपवाले पुडी सोडणारे आहेत. काँग्रेसचे लोक आमच्याकडे येतील असे ते सांगतात. त्यांच्याकडे कुणीही ते केवळ पुडी सोडतात, अशी टीकाही त्यांनी केली.
पटोले म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना पंचामृत असे वर्णन केले. शेतकऱ्यांना भरीव मदत करू असेही सांगितले. मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कर्ज माफ करू शकले नाही. सरकार अद्याप जमिनीवर यायला तयार नाही. कोणाला फोडायचे यासाठी दिल्ली वाऱ्या करण्यात ते व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. तेंलंगणा सरकारने धरण बांधल्याने गडचिरोली आणि पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपने आदिवासी समाजात भांडणे लावून मणिपूर जाळले
- भाजपने दोन्ही आदिवासी समाजात भांडणे लावून मणिपूर जाळले. मणिपूरमुळे देशाला कलंक लावण्याचे काम भाजपने केले आहे. ८० दिवस मणिपूर जळते आहे. पंतप्रधान ८० व्या दिवशी बोलले. काँग्रेस नेते राहुल गांधी त्याठिकाणी जाऊन आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगड मध्ये निवडणूक असल्यामुळे गेले आहेत. मात्र मणिपूर शांत करण्यासाठी ते गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.