कमलेश वानखेडे
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद खेचण्यात काँग्रेसला यश आले असून, या पदावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नेम साधणारे वडेट्टीवार यांना हायकमांडकडून एकप्रकारे पाठबळ देण्यात आले आहे. पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात या तीन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. तर दुसऱ्या फळीतील सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती; पण शेवटी विदर्भातीलच पटोले विरोधक असलेले वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली. या नियुक्तीमागे पटोले यांना ‘चेक’ देण्याची हायकमांडची खेळी असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा सुरू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला साथ दिल्याच्या कारणावरून पटोले यांनी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदमुक्त केले होते. देवतळे हे वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. देवतळेंवरील कारवाईमुळे दुखावलेल्या वडेट्टीवार यांनी समर्थकांसह दिल्ली गाठत पटोलेंकडून राजकीय द्वेशातून कारवाई करण्यात आल्याची बाजू मांडली होती.
पटोले यांच्या तक्रारीची दखल घेत अ. भा. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी देवतळे यांच्या निलंबनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर मात्र राजुराचे आ. सुभाष धोटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात विदर्भातील माजी मंत्र्यांनी एकत्र येत दिल्लीत पटोले हटाव मोहीम राबविली. या मोहिमेत वडेट्टीवार अग्रस्थानी होते, हे काही लपून राहिलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांना संधी देत त्यांचे राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या एका गोटाकडून झाल्याचे दिसत आहे.
पटोले समर्थक म्हणतात, नो टेन्शन
नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असे दावे पक्षांतर्गत विरोधकांकडून गेल्या सहा महिन्यांपासून केले जात आहेत. त्यासाठी वेळोवेळी दिल्लीवारीही झाल्या. पटोले यांच्या समर्थनार्थ शिष्टमंडळ दिल्लीत धडकले तेव्हा ‘कुछ तो गडबड है’, असे दावे केले जाऊ लागले. मात्र, पटोलेंचे पद कायम आहे. आता पटोले यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या गोटातील वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद देत हायकमांडने ‘बॅलन्स’ साधला आहे. याचा प्रदेशाध्यक्षपदावर काहीही परिणाम होणार नाही. बदल करायचा असता तर तो आजच केला असता. त्यामुळे ‘नो टेन्शन’, अशी सूचक प्रतिक्रिया विदर्भातील एका पटोले समर्थक नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आधी विखे, आता पवारामुळे संधी
राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच शिंदे सरकारसोबत थेट सत्तेत जाऊन बसले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. तेव्हापासून विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. या पदावर व़डेट्टीवार यांना संधी मिळाली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राधाकृष्ण विखे-पाटील भाजपसोबत गेल्यामुळे २४ जून २०१९ रोजी वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली होती.