नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्ह्यातील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. पीडित मुलगी १६ आठवड्यांची गर्भवती आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तिला हे बाळ नको हाेते. परिणामी, तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गर्भपाताची परवानगी मागितली होती. मुलगी आर्थिक दुर्बल घटकातील असून, ती बाळाचे पालनपोषण करू शकत नाही. बलात्कारामुळे ती सतत मानसिक त्रास सहन करत आहे, असे न्यायालयाला सांगण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. त्यामुळे पीडित मुलीला दिलासा मिळाला. मुलीच्यावतीने ॲड. स्विटी भाटिया यांनी बाजू मांडली.