हायकोर्ट : बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची याचिका खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 08:00 PM2019-09-27T20:00:54+5:302019-09-27T20:02:17+5:30
आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
संतोष चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली होती. लोकशाही वाचविण्यासाठी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्यात यावी, बॅलेट पेपरमध्ये सुधारणा करून त्यांना बूथनिहाय क्रमांक देण्यात यावेत, निवडणुकीत पारदर्शीपणा ठेवण्यात यावा यासह विविध मागण्या याचिकाकर्त्याने केल्या होत्या. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे सर्व दावे गुणवत्ताहीन असल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदवले. ईव्हीएमचा दुरुपयोग होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे पटलावर सादर करण्यात आले नाहीत. याचिकाकर्त्याला कायदेशीर तरतुदींचीही सखोल माहिती नाही. तसेच, त्याच्याकडे विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेदेखील नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले.