हायकोर्ट : ‘सीआयआयएचओ’ला कोरोना रुग्णालय घोषित करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 08:58 PM2020-08-27T20:58:46+5:302020-08-27T23:03:04+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी अॅण्ड ऑन्कोलॉजी (सीआयआयएचओ)ला कोरोना रुग्णालय घोषित करण्यास तात्पुरती मनाई केली. याकरिता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अविनाश पोफळी यांनी याचिका दाखल केली असून त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी अॅण्ड ऑन्कोलॉजी (सीआयआयएचओ)ला कोरोना रुग्णालय घोषित करण्यास तात्पुरती मनाई केली. याकरिता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अविनाश पोफळी यांनी याचिका दाखल केली असून त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
महानगरपालिकेने १९ ऑगस्ट रोजी आदेश जारी करून शहरातील १७ रुग्णालयांना कोरोना रुग्णालये घोषित केले आहे. पुढे चालून ‘सीआयआयएचओ’लाही कोरोना रुग्णालय घोषित केले जाण्याची शक्यता लक्षात घेता डॉ. पोफळी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘सीआयआयएचओ’ हे रक्ताचे आजार व रक्ताच्या कर्करोगावर उपचार करणारे विशेष रुग्णालय आहे. तसेच, मध्य भारतात केवळ याच रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केले जाते. खास त्याकरिता प्रशिक्षित कर्मचारी रुग्णालयात आहेत. तसेच, डॉ. पोफळी यांचे वय ६० वर्षे आहे व त्यांना मधुमेह आहे. त्यामुळे ‘सीआयआयएचओ’ला कोरोना रुग्णालय घोषित करू नये, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. आनंद परचुरे व अॅड. ओंकार देशपांडे यांनी कामकाज पाहिले.