हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:45 PM2020-06-01T21:45:42+5:302020-06-01T21:47:29+5:30
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. २०१७ मध्ये मनपाने टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप केल्या जातील, अशी ग्वाही उच्च न्यायालयाला दिली होती. त्या ग्वाहीचे उल्लंघन करण्यात आले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायालयात नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर सुनावणी केली जाणार आहे.
२३ जून २०१६ रोजीच्या ई-टेंडरनुसार शहरातील पाणीटंचाईच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मालकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१६ रोजी स्थायी समितीने या टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप करण्याविषयी ठराव पारित केला. दरम्यान, २०१७ मध्ये काही टँकर मालक फेऱ्या वाटपातील भेदभावासंदर्भात उच्च न्यायालयात गेले असता मनपाने स्थायी समितीच्या ठरावाचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गेल्या मार्चपर्यंत टँकर मालकांची सेवा सुरू होती. परंतु, मार्च-२०२० मध्ये अचानक १२० टँकर मालकांची सेवा बंद करण्यात आली. त्यात याचिकाकर्त्यांचा समावेश आहे. हा निर्णय घेताना टँकर मालकांना नोटीस देण्यात आली नाही. हा निर्णय रद्द करण्यासाठी मनपाला निवेदन देण्यात आले, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. या निर्णयामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. परिणामी, मनपा आयुक्त व इतर अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी कामकाज पाहिले.