लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे बुलडाणा शहर पोलिसांनी तबलिगी जमातच्या १२ सदस्यांविरुद्ध नोंदविलेला एफआयआर व संबंधित खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला़ न्यायमूर्तिद्वय झेड. ए़ हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
तबलिगी सदस्यांमध्ये शेख रोशन अकबर हुसैन, अब्दुल फरीद अब्दुल रेहमान, मो़ खुर्शीद मो़ अलिमुद्दीन, मंजूर अहमद मो़ आफक, शफिक अहमद मो़ युनिस, इरफान अहमद शकील अहमद, शकील अहमद मो़ इब्राहिम, शेख इब्राहिम शेख हब्बू, मो़ खुर्शीद शेख बाफती, अब्दुल सलीम अब्दुल रेहमान, मो़ डी़ इब्राहिम व सय्यद फारुख सय्यद उस्मान डोंगरे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २६९, २७०, साथरोग कायद्यातील कलम ३ व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. हे सदस्य शहरात संचारबंदी असताना हुसेनिया मरकझ मशिदीमध्ये गेले व तेथे मुक्कामी थांबले. सर्वांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दुसऱ्या चाचणीत केवळ तीन सदस्य पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु, पोलिसांनी पॉझिटिव्हचे रिपोर्ट न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणले नाहीत; त्यामुळे सदस्यांना दिलासा देण्यात आला. तबलिगी सदस्यांतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.