हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर निर्णय राखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 08:22 PM2019-09-09T20:22:02+5:302019-09-09T20:23:09+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.
३० जून २०१८ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर, आरोपींनी अपील दाखल करून सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ही घटना ३० जुलै २०१५ रोजी घडली होती. तकिया वॉर्डमध्ये बारिया यांचे घर आहे. आरोपींनी रात्री एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर संधी पाहून प्रीती बारिया (३०) यांना डोक्यावर हातोडीने वार करून ठार मारले. दरम्यान, बारिया यांचा मुलगा भव्य (९) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे तर, आरोपींतर्फे अॅड. ओमप्रकाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.