हायकोर्ट : दीपक बजाजला उपचारासाठी जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:11 PM2019-07-01T21:11:18+5:302019-07-01T21:12:48+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या बजाजला हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीदोष इत्यादी विविध प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे त्याने वैद्यकीय उपचारासाठी जामीन देण्याची आणि मुंबईतील बॉम्बे, सैफी किंवा ब्रिच कॅन्डी यापैकी कोणत्याही एका रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली होती. न्यायालयाने विविध अटींसह त्याची मागणी मान्य केली. न्यायालयाच्या अटीनुसार, बजाजला मुंबईत गेल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावून उपचाराचा कार्यक्रम सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित पोलीस बजाजला पाहण्यासाठी आठवड्यातून दोनदा रुग्णालयात जातील.
पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा बजाजवर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात २६ सप्टेंबर २०१५ रोजी एफआयआर नोंदवून बजाज व इतर आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून बजाज करागृहात आहे. बजाजतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अॅड. उदय डबले तर, सरकारतर्फे अॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.