कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 14, 2023 12:54 PM2023-03-14T12:54:52+5:302023-03-14T12:56:17+5:30
खटला अंतिम टप्प्यात पोहोचला
नागपूर : विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाचा खटला अंतिम टप्प्यात असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने आरोपी अंकित शिवभरण शाहू याला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्याचे यासंदर्भातील अपील निकाली काढले.
अपीलवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या हत्याकांडाचा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला येत्या जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आतापर्यंत सरकार पक्षाने सर्व साक्षीदार तपासले आहेत. याशिवाय आरोपींचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. येत्या २३ मार्चपासून अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने अंकितला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. परंतु, खटल्यावरील अंतिम सुनावणी लांबल्यास अंकितला पुन्हा जामीन मागण्याची मुभा देण्यात आली.
यापूर्वी अंकितने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु, त्याला जामीन मिळाला नाही. दरम्यान, त्याने खटला लांबत असल्याचे कारण सांगून दुसऱ्यांदा जामिनासाठी प्रयत्न केला होता. गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी ही देखील आरोप आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत.
अशी आहे घटना
उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे. तक्रारकर्ते रविकांत कांबळेतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.