हायकोर्ट : वकिलाला मारहाण केल्याने धंतोली पोलिसांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:58 PM2019-11-26T22:58:40+5:302019-11-26T22:59:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मुकुंद मधुकर एकरे असे पीडित वकिलाचे नाव आहे. एकरे यांच्याविरुद्ध कौटुंबिक वादाची तक्रार दाखल झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी गेल्या ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री त्यांच्या घरात अवैधपणे प्रवेश केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. तसेच,घरातून ओढत बाहेर काढले व पोलीस व्हॅनमध्ये दीड तास कोंबून ठेवले. त्यांचा मोबाईल फोन हिसकावून त्यातील या अवैध कारवाईचे रेकॉर्डिंग डीलिट केले. त्यामुळे एकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केले. परिणामी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी एक लाख रुपये भरपाई मिळण्याची मागणीही केली आहे. एकरे यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.