हायकोर्ट : नॅशनल इन्शुरन्सचे अपील खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 09:30 PM2019-06-19T21:30:05+5:302019-06-19T21:31:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अपील खारीज केले. १९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अपील खारीज केले.
१९ ऑक्टोबर २०११ रोजी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसदारांना भरपाईसाठी पात्र ठरवले होते. त्या निर्णयाविरुद्ध हे अपील दाखल करण्यात आले होते. अपीलवर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. मालवाहू वाहनामध्ये मालासह प्रवास केल्यामुळे विमा पॉलिसी अटींचे उल्लंघन होत नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मयताचे नाव लक्ष्मीबाई सुदित होते. ती वणी, जि. यवतमाळ येथील रहिवासी होती. तिने १ जून २००३ रोजी जनावरांसाठी चारा खरेदी केला व तो चारा घरी नेण्यासाठी ट्रकमध्ये भरला. तीही त्याच ट्रकमध्ये बसली. दरम्यान, ट्रकचा अपघात झाला. मालवाहू ट्रकमध्ये प्रवास केल्यामुळे विमा पॉलिसी अटींचा भंग झाला असे कारण देऊन कंपनीने लक्ष्मीबाईच्या वारसदार मुली सिंधू, इंदू व शालू यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे त्यांनी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती.