नागपूर : घटस्फोट मागणाऱ्या डॉक्टर पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर करण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणातील पत्नीही डॉक्टर असून, हे दाम्पत्य १७ वर्षांपासून वेगवेगळे राहत आहे. सध्या पती नागपूरमध्ये तर, पत्नी मध्य प्रदेशात आहे. त्यांचे लग्न १५ फेब्रुवारी २००१ रोजी झाले. २६ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांना मुलगी झाली. दरम्यान, विविध कारणांमुळे मतभेद वाढत गेल्यामुळे, ते ५ ऑगस्ट २००४ रोजी विभक्त झाले. त्यानंतर त्यांच्यात समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. करिता, पतीने घटस्फोटाकरिता सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३ डिसेंबर २०१५ रोजी ती याचिका खारीज करण्यात आल्यामुळे, त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
पत्नी सासू-सासऱ्याची काळजी घेत नाही. त्यांचा मानपान करीत नाही. ती संशयी स्वभावाची आहे. तिने सिकलसेल आजार लपवून ठेवला, असे आरोप पतीने करून या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागितला होता. पत्नीने हे सर्व आरोप अमान्य केले. उच्च न्यायालयाला पतीचे आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे पतीचे अपील फेटाळण्यात आले.