हायकोर्टाने आरोपी गुडिया शाहूचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:32 AM2018-07-27T00:32:20+5:302018-07-27T00:33:13+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू हिला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, तिचे यासंदर्भातील अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू हिला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, तिचे यासंदर्भातील अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.
सत्र न्यायालयाने गुडियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर राज्य सरकारने सादर केलेल्या पुराव्यांवरून या प्रकरणात गुडियाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे न्यायालयाला दिसून आले. त्यामुळे तिला दिलासा नाकारण्यात आला. गुडिया गर्भवती असून तिने या आधारावर जामीन मागितला होता. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. गुडियाचा पती गणेश शाहू मुख्य आरोपी आहे. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांचा भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. तसेच, दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. गुडियातर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण, फिर्यादीतर्फे अॅड. राजेंद्र डागा तर, सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.