नागपुरातील बेवारस कुत्र्यांच्या हैदोसावर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:57 PM2018-10-03T22:57:33+5:302018-10-03T22:59:20+5:30
गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपाययोजना करीत आहे अशी विचारणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपाययोजना करीत आहे अशी विचारणा केली.
यासंदर्भात अंकिता शाह यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शाह यांनी बेवारस कुत्र्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले असल्याचे सांगितले. न्यायालयाने याविषयी वर्तमानपत्रांत बातम्या छापून येत असल्याची प्रतिक्रिया त्यावर व्यक्त केली.
भांडेवाडी येथील प्राण्यांच्या शेल्टर होमच्या दूरवस्थेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शेल्टर होममध्ये प्राण्यांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शेल्टर होम बंद करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्या याचिकेत बेवारस कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु, सध्या नसबंदी कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बेवारस कुत्रे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. चावा घेणे, गाडीच्या मागे धावणे, अंगावर भुकणे इत्यादी प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गाडीच्या मागे कुत्रे धावल्यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत असा दावा शाह यांनी केला आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पाळीव प्राण्यांचा विषय उपस्थित केला व पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय अशी विचारणा मनपाला केली.