लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर सुधीर जोशी व इतर आरोपींविरुद्धचा खटला निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी चौथ्यांदा मुदतवाढ दिली़
न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. समीर जोशीने २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात हा खटला वेगात निकाली काढण्याची विनंती केली. दरम्यान, सदर खटला चालवित असलेल्या एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने २६ एप्रिल २०२१ रोजी उच्च न्यायालयाला विनंतीपत्र सादर करून हा खटला निकाली काढण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली. आतापर्यंत ५५ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली असून, अजून ४९ साक्षीदार तपासायचे बाकी आहेत तसेच सध्या कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे नियमित पद्धतीने कामकाज करणे शक्य नाही, असे विशेष सत्र न्यायालयाने मुदतवाढ मागताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेऊन विशेष सत्र न्यायालयाला सहा महिने वेळ वाढवून दिला़
उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढण्यासाठी वेळ वाढवून देण्याची ही चौथी वेळ होय़. यापूर्वी उच्च न्यायालयाने सुरुवातीला २० फेब्रुवारी २०१८ रोजी हा खटला २७ फेब्रुवारी २०१८ पासून एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिला होता. यानंतर सत्र न्यायालयाच्या विनंतीवरून ८ मार्च २०१९ रोजी सहा महिने वेळ वाढवण्यात आला आणि त्यापुढे ३० ऑगस्ट २०१९ रोजी दीड वर्षे वेळ वाढवून देण्यात आला होता़