ऑनलाईन लोकमत
नागपूर : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मो. शरीफ शब्बीर अहमद याला बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे.मो. शरीफ हा कुख्यात दहशतवादी अबू जुंदालचा साथीदार आहे. त्याला १४ वर्षांचा कारावास झाला आहे. सध्या तो अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ८ मे २००६ रोजी महाराष्ट्र एटीएस पथकाने तीन दहशतवाद्यांना ३० किलो आरडीएक्स, १० एके-४७ रायफल्स व ३२०० बुलेटस्सह औरंगाबादजवळ अटक केली होती. त्यांच्यासोबतच्या दुसºया गाडीमध्ये अबू जुंदालही होता असा एटीएसला संशय आहे. त्यावेळी तो एटीएसच्या ताब्यात आला नव्हता. त्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. आरोपींचा देशामध्ये मोठा घातपात घडविण्याचा हेतू होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान मो. शरीफचे नाव पुढे आले होते. विशेष न्यायालयाने याप्रकरणात जुंदाल व मो. शरीफसह एकूण १२ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.मो. शरीफने बहिणीच्या मृत्यूनंतर अभिवचन रजा मिळण्यासाठी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांकडे अर्ज केला होता. परंतु, तो दहशतवादी गुन्ह्यांतील कैदी असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता मो. शरीफची याचिका मंजूर केली. मो. शरीफच्या वतीने अॅड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.