हायकोर्ट : बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:12 AM2019-09-24T00:12:27+5:302019-09-24T00:13:13+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका दिला. ही घटना वर्धा येथील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका दिला. ही घटना वर्धा येथील आहे.
इम्रान युसूफ शेख (३०) असे आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबी लक्षात घेता, आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. तिने १ एप्रिल २०१४ रोजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने या तारखेच्या पाच महिन्यापूर्वी पीडित मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला धमक्या देऊन बलात्काराची वारंवार पुनरावृत्ती केली. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलीला जन्म दिला. डीएनए अहवालातून आरोपी त्या मुलीचा पिता असल्याचे स्पष्ट झाले. हा पुरावा आरोपीला दोषी ठरविण्यासाठी महत्त्वाचा ठरला.