लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. खंडणीसाठी मारहाण करणे व धमकी देणे या गुन्ह्यांचा समावेश असलेला एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई करावी. तसेच, झाडांना पाणी देणे, उद्यानाची देखभाल करणे इत्यादी कामे करावीत असे उच्च न्यायालयाने सांगितले.न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांनी प्रकरणावर निर्णय दिला. अहफाज अहमद एजाज अहमद असे आरोपीचे तर, अजहर खान अफजल खान असे फिर्यादीचे नाव आहे. या दोघांनी आपसात तडजोड केल्यानंतर एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता. अजहर खानला रागाच्या भरात मारहाण केली व धमकी दिली. त्याच्यासोबत कोणतेही वैर नाही असे आरोपी अहफाजचे म्हणणे होते. तसेच, अजहर खान याने तडजोड करून वाद संपवल्याचे व आरोपी अहफाजविरुद्ध आता काही तक्रार नसल्याचे सांगितले होते.राज्य सरकारने या अर्जाला जोरदार विरोध केला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी तपासाकरिता शक्ती व वेळ खर्च केला. त्यामुळे हा एफआयआर विनाशर्त रद्द करणे योग्य होणार नाही याकडे सरकारने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाला सरकारची बाजू पटली. परिणामी, न्यायालयाने हा हटके आदेश दिला. विद्यापीठाचे कुलसचिवांनी अर्जदारांकडून संबंधित कामे करून घ्यावीत. त्यांच्या कामावर लक्ष ठेवावे व १५ दिवसानंतर न्यायालयात अहवाल सादर करावा असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले आहेत. तसेच, अर्जदारांनी या आदेशाचे पालन केले तरच एफआयआर रद्द होईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारतर्फे अॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.अशी आहे घटनाफिर्यादी मजहर खानच्या तक्रारीनुसार, ही घटना २४ जून २०१६ रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. खान मोटरसायकलने घरी जात होता. दरम्यान, आरोपी अहफाजने त्याला नागपुरी गेटजवळ थांबवले. त्याला मारहाण करून ११ लाख रुपयाची खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे खानने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हायकोर्टाचा हटके दणका : एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात साफसफाई करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 8:18 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई करावी.
ठळक मुद्देफिर्यादी व आरोपीला अमरावती विद्यापीठात द्यावी लागेल सेवा