गंभीर कोरोना रुग्णांना हायकोर्टाचा रात्री उशिरा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 09:07 AM2021-03-24T09:07:52+5:302021-03-24T09:08:14+5:30
Nagpur news कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून रुग्णांना खाटा कमी पडत आहेत. मंगळवारी सुमारे ५० ते ६० कोरोना रुग्ण खाटांच्या प्रतीक्षेत मेडिकलमध्ये गोळा होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या रुग्णांना मेडिकलच्या बेसमेंटमधील ९० खाटा देण्यास परवानगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून रुग्णांना खाटा कमी पडत आहेत. मंगळवारी सुमारे ५० ते ६० कोरोना रुग्ण खाटांच्या प्रतीक्षेत मेडिकलमध्ये गोळा होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या रुग्णांना मेडिकलच्या बेसमेंटमधील ९० खाटा देण्यास परवानगी दिली. या खाटा ऑक्सिजन सुविधेसह आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाने सध्याची गंभीर परिस्थितीची स्वत:हून दखल घेतली व रात्री उशिरा न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
न्यायालयात कोरोनासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. गेल्यावर्षी पाणी साचल्यामुळे बेसमेंटमध्ये आरोग्यास धोकादायक वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२० रोजी बेसमेंटमधील ९० खाटा कोरोना रुग्णासाठी वापरण्यास मनाई केली होती. सध्या कोरोना रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. बेसमेंटमधील खाटा उपलब्ध असताना त्या न्यायालयाच्या मानाईमुळे वापरता येत नव्हत्या. करिता मेडिकलच्या डॉ. कांचन वानखेडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून संबंधित मनाई आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली. रात्री उशिरा न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी यावरील सुनावणी घेतली. बेसमेंटमधील खाटा कोरोना रुग्णांसाठी वापरण्याकरिता सज्ज आहेत, असे सांगत मुख्य सरकारी वकील केतकी जोशी यांनी यासंदर्भातील छायाचित्रेही न्यायालयात सादर केली. न्यायालयाने सध्याची गंभीर परिस्थिती पाहता बेसमेंटमधील खाटा कोरोना रुग्णांना वापरण्यास परवानगी दिली.
एम्समध्ये ६० खाटा उपलब्ध
-एम्समध्ये कोरोना रुग्णासाठी ६० खाटा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारचे वकील उल्हास औरंगाबादकर यांनी न्यायालयाला दिली. तसेच मेडिकल, मनपा व जिल्हाधिकारी हे गरजेनुसार कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी एम्सशी संपर्क करू शकतात असेही त्यांनी सांगितले.