लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.प्रेमचंद चंद्रभान चरडे (६५) असे आरोपीचे नाव असून तो चंडिका वॉर्ड येथील रहिवासी आहे. ३० एप्रिल २०१६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ६००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास तर, कलम ३०७ अंतर्गत सात वर्षे कारावास व ४००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फे टाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मयताचे नाव नंदकिशोर कोरडे होते. कोरडेचे वडील व आरोपीमध्ये दुकान खरेदीवरून वाद झाला होता. तेव्हापासून त्यांचे सतत खटके उडत होते. २६ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपीने कोरडेसह इतर तिघांना चाकूने भोसकले. त्यात कोरडेचा मृत्यू झाला तर, इतर तिघे गंभीर जखमी झाले होते. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. एस. डी. सिरपूरकर यांनी कामकाज पाहिले.