हायकोर्ट : आरोपीची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:01 PM2019-07-02T22:01:17+5:302019-07-02T22:02:24+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
सुनील श्यामलाल केवट (३०) असे आरोपीचे नाव असून तो मा बंबलेश्वरीनगर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव रुकसाना बानो होते. ती यशोधरानगरातील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करीत होती. आरोपी त्या इमारतीमधील ऑक्सिजन सिलेंडर कंपनीत कार्यरत होता. १९ एप्रिल २०१५ रोजी रात्री आरोपी केवट रुकसानाच्या घरी भोजनासाठी गेला होता. ते रात्री ११ वाजेपर्यंत सोबत होते. त्यांना अनेकांनी पाहिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुकसानाचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. यशोधरानगर पोलिसांनी आवश्यक पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तयार केले. २६ जुलै २०१६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.