लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे विविध जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ''''ड्राय डे''''च्या आदेशाची व्याप्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मर्यादित केली. संबंधित आदेश मतदानाच्या दिवशी (१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि मतमोजनीच्या दिवशी (३ डिसेंबर) निकाल घोषित होतपर्यंतच लागू राहतील असे निर्देश न्यायालयाने दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. काही जिल्हाधिकाऱ्यांचे ''''ड्राय डे''''चे आदेश मतदानाच्या ४८ तासापूर्वी सुरू होऊन मतदान संपतपर्यंत तर, काही आदेश मतमोजनीच्या संपूर्ण दिवसाकरिता लागू करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र वाईन मर्चंन्टस् असोसिएशन नागपूर व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा दिला.