- राकेश घानोडेनागपूर : सहा अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता ७१ झाली आहे. परंतु, मंजूर पदे पूर्णपणे भरण्यासाठी या न्यायालयाला आणखी २३ न्यायमूर्तींची गरज आहे.या न्यायालयाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ न्यायमूर्तींची पदे मंजूर आहेत. सहा नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्त्या होण्यापूर्वी न्यायालयात ५६ कायम व ९ अतिरिक्त असे एकूण ६५ न्यायमूर्तीच कार्यरत होते. नवीन नियुक्त्यांमुळे ही संख्या वाढून ७१ (कायम-५६, अतिरिक्त-१५) झाली आहे. नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींमध्ये मुकुंद सेवलीकर, वीरेंद्रसिंग बिष्ट, बी. यू. देबडवार, मुकुलिका जवळकर, सुरेंद्र तावडे व नितीन बोरकर यांचा समावेश आहे. ३ डिसेंबर रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली. या अतिरिक्त न्यायमूर्तींचा ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर ते न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करतील.या वर्षी मिळाले ११ अतिरिक्त न्यायमूर्तीयावर्षी या न्यायालयाला आतापर्यंत ११ अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले आहेत. अजून काही विधिज्ञांची नावे अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी विचाराधीन आहेत. गेल्या आॅगस्टमध्ये पुष्पा गणेडीवाला, अविनाश घरोटे, नितीन सूर्यवंशी, अनिल किलोर व मिलिंद जाधव या पाच विधिज्ञांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१८ मध्ये या न्यायालयाला केवळ चार अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले होते. त्यात श्रीराम मोडक, एन. जे. जमादार, विनय जोशी व राजेंद्र अवचट यांचा समावेश आहे.
हायकोर्टाला आणखी २३ न्यायमूर्तींची गरज; ९४ पदे मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:06 AM