हायकोर्ट : राज्य निवडणूक आयुक्तांना अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:33 PM2019-10-16T22:33:08+5:302019-10-16T22:35:56+5:30
न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंद्रधनू सामाजिक संस्था व सेवानिवृत्त शास्त्रज्ञ पी. एन. अंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल करून लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत असा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प, हॅन्डरेल, व्हील चेयर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. ३ एप्रिल २०१९ रोजी राज्य सरकारने याचिकाकर्त्यांची विनंती पूर्ण केली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर न्यायालयाने संबंधित अर्ज निकाली काढला होता. त्यानंतर सरकारने न्यायालयाला दिलेल्या ग्वाहीचे पालन केले नाही. मतदान केंद्रांवर दिव्यांगांना ५ एप्रिल २००५ रोजीच्या शासन निर्णयानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दिव्यांगांची गैरसाय झाली. करिता वरील जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमानना कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सेजल लखानी यांनी कामकाज पाहिले.