लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फीसंदर्भातील प्रकरणात महात्मे आय हॉस्पिटलचे प्रोप्रायटर व राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना नोटीस बजावून २४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.नरेंद्र मेश्राम असे बडतर्फ कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रकरणातील माहितीनुसार, मेश्राम यांची २००५ मध्ये महात्मे आय हॉस्पिटल येथे वाहन चालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, ते हॉस्पिटलमधील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर त्यांना विविध आरोपांखाली बडतर्फ करण्यात आले. त्याविरुद्ध त्यांनी कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालयात दाद मागितली, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेश्रामतर्फे अॅड. शरदकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले.