लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद व इतर तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जोरदार दणका बसला. या आरोपींनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील खंडणी, फसवणूक व इतर संबंधित गुन्ह्यांचा एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांनी हा निर्वाळा दिला.
संबंधित एफआयआर एका महिलेच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे. त्या तक्रारीनुसार, साहिलने त्याचे आधीच लग्न झाले असतानाही अविवाहित असल्याची माहिती देऊन फिर्यादी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. दरम्यान, नवीन नरसाळा येथे २१ लाख रुपयांत सदनिका खरेदी करून तेथे ते दोघेही पती-पत्नीसारखे राहायला लागले. सदनिका खरेदीसाठी फिर्यादीने पाच लाख रुपये दिले होते. एक वर्षानंतर साहिलने फिर्यादीसोबत लग्न केले. पुढे काही दिवसांनी फिर्यादीला साहिल आधीच विवाहित होता हे कळले. परिणामी, फिर्यादीने साहिलला जाब विचारून भांडण केले. ऑगस्ट-२०१९ मध्ये साहिलने फिर्यादीला ठार मारण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन नरसाळातील सदनिका स्वत:च्या नावावर केली. त्यासाठी साहिलला इतर आरोपींनी मदत केली. त्यामुळे फिर्यादीने १० ऑगस्ट २०२० रोजी सर्व आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
जुने गुन्हे लपवल्याने फटकारले
साहिलने सदर अर्जामध्ये जुन्या गुन्ह्यांची माहिती नमूद केली नाही. त्यामुळे न्यायालयाने साहिलला फटकारले. तो स्वच्छ हाताने न्यायालयात आला नाही. त्याने जुने गुन्हे लपवून ठेवले. त्यामुळे त्याला कोणताही दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण आदेशात नोंदविण्यात आले.