ईव्हीएमविरुद्धच्या कार्यक्रमाला हायकोर्टाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 08:23 PM2019-09-05T20:23:41+5:302019-09-05T20:35:32+5:30
इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. त्यामुळे आयोजकांना दिलासा मिळाला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
फोरमचे कार्यकर्ते सुनील जवादे यांनी ३ सप्टेंबर रोजी सीताबर्डी पोलिसांना अर्ज सादर करून, या कार्यक्रमाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्याच दिवशी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नागपूरला येणार असल्यामुळे, ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत असे कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे कारण वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले होते. त्याविरुद्ध फोरम व सुनील जवादे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. पंतप्रधान ७ सप्टेंबर रोजी नागपुरात येऊन त्याच दिवशी पुढच्या कार्यक्रमासाठी दुसरीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्याची परवानगी नाकारण्यात काहीच अर्थ नाही. यापूर्वी विविध ठिकाणी शांततेत कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व व्यक्ती कायदा पाळणारे असून, कुणाविरुद्धही गुन्हे दाखल नाहीत. हे दहा दिवसाचे अभियान आहे. त्याची सुरुवात संविधान चौकातून होणार आहे आणि मुंबईतील शिवाजी पार्क येथे समारोप केला जाणार आहे. परिणामी, सीताबर्डी पोलिसांचा वादग्रस्त निर्णय रद्द करून कार्यक्रमाला परवानगी देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा व अॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.
ईव्हीएमविरोधात ‘दीक्षाभूमी ते चैत्यभूमी’ महाअभियान
महाराष्ट्राच्या विधानसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे करण्याच्या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्यावतीने दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान महाअभियान राबविण्यात येणार आहे. येत्या रविवारी दीक्षाभूमी येथून हे अभियान सुरू होणार असून, मुंबईपर्यंत रथयात्रा व मार्गातील प्रत्येक शहरात पदयात्रा काढून जनतेमध्ये बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यात येणार आहे.
८ सप्टेंबर रोजी या महाअभियानाची सुरुवात दुपारी २ वाजता संविधान चौक येथून करण्यात येणार आहे. नागपूरनंतर वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणेनंतर मुंबई येथे महाअभियानाचा समारोप होईल. या प्रत्येक शहरात आणि गावात ईव्हीएमविरोधात जनजागृती सभा, आंदोलन करण्यात येणार आहे. या महाअभियानासाठी झालेल्या बैठकीत संयोजक अॅड. स्मिता कांबळे, प्रशांत पवार, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, रोशन बहेरे, कुणाल टेंभुरकर, नीलेश बागडे, प्रफुल्ल मेश्राम, घनश्याम फुसे, क्षितिज रामटेके, प्रांजल बागडे, गुड्डू गोसावी, प्रीतम बुलकुंडे, विश्वास पाटील, सुनील जवादे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी व इतर पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.