लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील प्रादेशिक कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर फिजिकल सुनावणी होणार आहे. याकरिता विशेष न्यायपीठ स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर करण्यात आला आहे.
निकिता लखोटिया या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. दरम्यान, काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर फिजिकल सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून याचिकाकर्तीला याकरिता मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर करण्यास सांगितले. त्यानुसार, याचिकाकर्तीने मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर केला आहे.
राज्य सरकारने ७ सप्टेंबर २०२० रोजी प्रादेशिक कोटा रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध, एकतर्फी व समानतेच्या अधिकाराचे उल्लघन करणारा आणि विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहचविणारा आहे असे तिचे म्हणणे आहे. हा वादग्रस्त निर्णय रद्द करून जुन्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती तिने न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्तीतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व ॲड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.