हायकोर्ट : चुकीच्या वीज बिलाविरुद्ध जनहित याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:43 AM2020-07-16T01:43:19+5:302020-07-16T01:44:53+5:30
राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीजबिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांना अचूक बिले पाठविण्यात यावी व ही प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत नागरिकांवर सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.
याचिकेत राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव व महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने कोरोना संक्रमणामुळे फेब्रुवारीपासून मीटर रिडिंग घेणे बंद केले होते. त्यानंतर थेट जूनमध्ये रिडिंग घेण्यात आले. परिणामी, नागरिकांना वीज बिले पाठविण्यात मोठा घोळ झाला आहे. अनेकांना अवास्तव वीज बिले पाठविण्यात आली आहेत. बिले निर्धारित करताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही असे मून यांचे म्हणणे आहे. त्यांनी याचिकेमध्ये संध्या मून यांच्या वीज बिलाचे उदाहरण दिले आहे. संध्या मून यांना १४७२ युनिटकरिता १८ हजार ७२० रुपयाचे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल चुकीचे असल्यामुळे १० जुलै रोजी महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.