सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 22, 2023 05:09 PM2023-05-22T17:09:18+5:302023-05-22T17:10:07+5:30

उच्च न्यायालयाचा निर्णय : छळाचा आरोप सिद्ध झाला नाही

High court refusal to give alimony to a wife who says she does not want her mother-in-law, father-in-law | सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार

सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार

googlenewsNext

नागपूर : सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या आणि पतीला केवळ राजा-राणीचा संसार करण्यासाठी बाध्य करू पाहणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही चपराक बसली. कुटुंब न्यायालयानंतरउच्च न्यायालयाने तिला पोटगीसाठी अपात्र ठरविले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी असून त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे तिचा शारीरिक-मानसिक छळ करीत होते. त्यांनी तिला घराहेर काढले. परिणामी, ती माहेरी निघून गेली, असा आरोप केला गेला होता. परंतु, हे आरोप सिद्ध झाले नाही.

पत्नीने कुटुंब न्यायालयात दिलेल्या जबाबावरून, तिची पतीविरुद्ध काहीच तक्रार नाही, हे दिसून आले. तसेच, तिला सासू-सासरे नको आहेत. तिला केवळ पतीसोबत राहायचे आहे, हे आढळून आले. २०१० मध्ये पत्नी माहेरी गेली होती. त्यावेळी ती पतीसोबत परत आली होती. छळ झाला असता तर, तिने सासरी परत येण्याचा निर्णय घेतला नसता, याकडे हा निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. पत्नी आठवड्यातून तीन दिवस महानुभाव पंथीय मंदिरात जात होती. त्यावरून तिला मंदिरात जाण्याची मुभा होती, हे स्पष्ट झाले.

ठोस कारणांशिवाय वेगळी झाली

पत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीपासून वेगळी झाली आहे. पतीने तिला सासरी परत आणण्याचे प्रयत्न केले, पण तिने प्रतिसाद दिला नाही. पतीने स्वत:हून पत्नीची देखभाल करणे टाळले नाही. करिता, तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. कुटुंब न्यायालयाने ९ मे २०१४ रोजी पत्नीची मासिक पाच हजार रुपये पोटगीची मागणी नामंजूर केली होती. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: High court refusal to give alimony to a wife who says she does not want her mother-in-law, father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.