लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बहि:शाल विद्यार्थिनी प्रीती तायडे हिच्या याचिकेमध्ये संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या अंतिम सत्रीय परीक्षेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, ही परीक्षा ठरल्याप्रमाणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ऑनलाईन परीक्षेचा प्रयोग फसल्यानंतर विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळ अध्यक्षांनी २४ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करून संबंधित महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर आपापल्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्रीय परीक्षेची प्रक्रिया दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आणि ५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण सादर करण्याचे आदेश दिले. ही अधिसूचना अवैध असल्याचा दावा प्रीतीने केला आहे. अशा पद्धतीने परीक्षा घेतल्यास गुणवान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य व करिअर धोक्यात येईल असे तिचे म्हणणे आहे. प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, तिने वादग्रस्त अधिसूचनेवर अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली. परंतु, न्यायालयाने अन्य विविध बाबी लक्षात घेता तिला हा दिलासा दिला नाही. याशिवाय न्यायालयाने अमरावती विद्यापीठाला नोटीस बजावून याचिकेवर ११ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकाकर्तीतर्फे ॲड. प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले.