Hindustani Bhau : 'हिंदुस्थानी भाऊ'ला तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 01:38 PM2022-03-15T13:38:16+5:302022-03-15T18:32:56+5:30
हिंदुस्थानी भाऊविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली.
नागपूर : विद्यार्थ्यांची माथी भडकावून त्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ(Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला.
हिंदुस्थानी भाऊविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारला नोटीस बजावून १७ मार्चपर्यंत उत्तर मागितले. दरम्यान हिंदुस्थानी भाऊने तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याची ही विनंती अमान्य केली.
हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाटक याच्या चिथावणीला बळी पडून शेकडो विद्यार्थ्यांनी 'दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊ नये', या मागणीसाठी मेडिकल चौकात आंदोलन केले. याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांनी मनपाच्या बसची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले होते.
काय आहे प्रकरण
दहावी - बारावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज पाठवून विकास पाठक याने मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्या या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती, असा आरोप विकास पाठक म्हणजेच हिंदुस्तानी भाऊवर ठेवण्यात आला आहे. कोरोनाचा धोका वाढला असताना त्याने जागोजागी गर्दी जमवल्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच तीव्र झाला होता. या प्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसीविरोधात विकास पाठकने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.