नागपूर : कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या चार साथिदारांनी दहशतवादी कारवाया प्रकरणातील शिक्षेविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखीव ठेवला. अपीलवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.
साईबाबाच्या साथिदारांमध्ये महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर व विजय नान तिरकी यांचा समावेश आहे. पाचवा साथिदार पांडू पोरा नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली आहे. तसेच, सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला आहे. त्यावर आरोपींचा आक्षेप आहे.
या आरोपीविरुद्धच्या कारवाईला गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली. गडचिरोली विशेष शाखेत कार्यरत तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांना महेश तिरकी व पांडू नरोटे हे सीपीआय (माओवादी) व आरडीएफ या प्रतिबंधित संघटनांचे सक्रीय सदस्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस या दोघांवर पाळत ठेवून होते. त्यानंतर सर्व सहाही आरोपींना गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.