नागपूर : स्वत:चा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांची क्रूरपणे हत्या करणारा नररूपी सैतान विवेक गुलाब पालटकर (४०) याच्या फाशीच्या प्रकरणावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला. निर्णयाची तारीख जाहीर करण्यात आली नाही.
मृतांमध्ये आरोपीचा मुलगा कृष्णा, बहीण अर्चना पवनकर (४५), अर्चनाचा पती कमलाकर (४८), सासू मीराबाई (७३) व मुलगी वेदांती (१२) यांचा समावेश आहे. पालटकरला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला त्यातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे ते पालटकरला पैसे मागत होते. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. परिणामी, आरोपीने ११ जून २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर संबंधित पाचही जनांचा निर्घृण खून केला. घटनेच्या वेळी पालटकरची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली या दोघीही घरात होत्या. त्या सुदैवाने बचावल्या. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. १५ एप्रिल २०२३ रोजी सत्र न्यायालयाने पालटकरला फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे, फिर्यादीतर्फे ॲड. मो. अतिक तर, आरोपीतर्फे ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.