लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात एकीकडे कोरोना व ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये औषधी व वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन या परिस्थितीत सरकार बेसावध राहिल्यास राज्यात कोरोना हाहाकार माजवील, अशा शब्दांत सरकारचे कान टोचले, तसेच राज्यातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये औषधी व वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त केली. प्राथमिक बाबी लक्षात घेता राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या उदासीनतेमुळे कोरोनाची नवीन लाट थोपविण्याचे सर्व प्रयत्न उद्ध्वस्त होऊ शकतात.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यात आरोग्याचे संकट निर्माण होऊ नये यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे, असेही न्यायालय म्हणाले, तसेच औषधी व वैद्यकीय साहित्यांच्या तुटवड्यावर येत्या १२ जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले.