हायकोर्ट : एपीएमसी निवडणूक घेण्यासाठी सहा महिने मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:43 AM2020-08-26T00:43:47+5:302020-08-26T00:45:06+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही निवडणूक तातडीने घेण्यात यावी याकरिता अहमदभाई करीमभाई शेख यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने कोरोना संक्रमणामुळे ही निवडणूक तातडीने घेणे शक्य नसल्याची भूमिका मांडली. तसेच, निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारची विनंती मान्य केली. तसेच, ही निवडणूक लवकर व्हावी याकरिता शेख यांनी ७ जानेवारी २०२० रोजी सादर केलेल्या निवेदनावर सहा आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. हा निर्णय घेताना सदर आदेशामुळे प्रभावित होऊ नये असेदेखील सरकारला सांगितले.
ही निवडणूक २०१८ पासून सतत लांबत आहे. उच्च न्यायालयाने प्रथम १६ जानेवारी २०१८ रोजी समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणूक घेण्यासाठी सरकारच्या विनंतीवरून २७ सप्टेंबर २०१९ रोजी तीन महिने तर, २४ जानेवारी २०२० रोजी सहा महिने वेळ वाढवून देण्यात आला. आता परत निवडणूक घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.