वाग्दत्त वधूला रिसॉर्टमध्ये नेऊन 'कार्यभाग' साधलेल्या व्यावसायिकाला उच्च न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 07:07 PM2021-12-27T19:07:36+5:302021-12-27T19:09:00+5:30
Nagpur News भावी पत्नीकडून वासनेची भूक शमवून घेताच तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला.
नागपूर : भावी पत्नीकडून वासनेची भूक शमवून घेताच तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला. या व्यावसायिकाने बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
नवनीत अशोक बांगलकर (२९) असे व्यावसायिकाचे नाव असून तो आसगाव, ता. पवनी, जि. भंडारा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध उमरेड पोलिसांनी १ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे. बांगलकरचे पीडित मुलगी नैना (काल्पनिक नाव) हिच्यासोबत लग्न पक्के झाले होते. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे दोन वेळा लग्न पुढे ढकलावे लागले. दरम्यान, बांगलकरने त्याच्या वाढदिवसानिमित्त कऱ्हांडला जंगल परिसरातील रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित केली. त्या दिवशी त्याने नैनावर दोन वेळा बलात्कार केला. तेथून पुढे तो नैनाला टाळायला लागला आणि काही दिवसांनी त्याने नैनासोबत पटत नसल्याचे कारण सांगून लग्न तोडले, असा पोलीस तक्रारीतील आरोप आहे. बांगलकरने लग्न तोडल्यानंतर पीडित मुलीने ही तक्रार नोंदविली.
आरोपी छुप्या हेतूने वागला
वासनेची भूक शांत केल्यानंतर संबंधित मुलीसोबत लग्न करायचे नाही, हा आरोपीचा छुपा हेतू होता. आपण लवकरच लग्न करणार आहोत, असे आरोपीने पीडित मुलीला पटवून देऊन शरीरसंबंधासाठी तिची सहमती मिळविली. मुलीने ही सहमती स्वेच्छेने दिली नव्हती. हा साध्या फसवणुकीचा गुन्हा नाही. आरोपीने फसवणुकीसह बलात्कारही केला आहे, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.