लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपसंपदा गोळा केल्याचा आरोप असलेले काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नोटीसविरुद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्या न्यायपीठाने ठाकूर यांना हा दणका दिला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ठाकूर यांनी अपसंपदा गोळा केल्याची तक्रार मिळाली आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसीबी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी ४ मार्च २०२० रोजी ठाकूर यांना नोटीस बजावून तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीकरिता प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यावर ठाकूर यांचा आक्षेप होता. पोलीस निरीक्षकांना अशी नोटीस बजावण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. राज्य सरकारने त्यांचे मुद्दे खोडून काढले. ही तक्रारीची प्राथमिक चौकशी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार, गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र, हे जाणून घेण्यासाठी अशी चौकशी करता येते. ही चौकशी कायद्यानुसार आहे, असे सरकारने सांगितले. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता, ठाकूर यांची याचिका फेटाळून लावली. राज्य सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.